व. पु

महोत्सव


आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो.

निर्जीव वस्तूंबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केलीत तर त्यातूनच जित्याजागत्या माणसाचा आदर करणं हा सहजधर्म होईल.

एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे.

एका माणसाच्या समस्येवर दुसर्‍या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोचू शकत नाही. तो स्व:तच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणार्‍या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही.

सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा, अंतर्मनातल्या वीणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द. ’जास्त’. दँट्स आँल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्टा, जास्त मोठं घर, जास्त वरचं पद, प्रेम आणि जास्त सेक्सही! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त!

व्यवसायासाठी पार्टनरशिप करता येते. पण घर गाठल्यावर कोणत्याही व्यक्तीला प्रथम घरंच हवं असतं. भूक, शरीरधर्म सगळं रुटीन असतं. पण जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की - गंमत म्हणून शब्द वापरतो - रुटीनचं प्रोटीन होतं.

बुध्द सांगतो, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. प्रावासात जर एखादा मोठा दगड वाटे आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.

यू नेव्हर मीट द सेम मँन अगेन.

जीवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ’स्व’ उरत नाही.

सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल, तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं, हे मान्य करावं. रक्षण कुणापासून करणार? कोण करणार? रक्षक ठेवून कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फ़क्त तू तुझ्यापुरतं आठवं.

No comments:

Post a Comment