कसं जमतं गं तुला?
एकांत क्षणी प्रेयसी होणं...
निवांत क्षणी सखी होणं...
अपयशाच्या क्षणी आई होणं...
अन यशाच्या क्षणी सहचारिणी होणं...
किती बदलतेस भूमिका
किती वेळा, कशा?
कसं जमतं गं तुला?
भूक लागली असता भाकरी होणं,
स्पर्श हवा असता रेशीम होणं,
गंध हवा असता मोगरा होणं,
अन तहान लागली असता पाऊस होणं…
कसं कळतं गं तुला?
मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?
आणि जमतं तरी कसं
असं भाकरी, रेशीम, मोगरा होणं
किंवा पाऊस होऊन कोसळणं
मला जेंव्हा हवं तेंव्हा,
मला जसं हवं तसं…
मी मात्र गृहित धरतो
मला हव्या त्या वेळी, हव्या त्या रूपात
तू असशीलच हे
तुला ‘बायको’ नावाचं लेबल लावतो
आणि 'बायकोनी असंच असलं पाहिजे'
हे मानतच जातो मनोमन.......
माझं हे मानणं, माझी ही गृहितं, माझ्या ह्या अपेक्षा...
ह्याही तू स्वीकारतेस मनोमन...
अन वागतेस हे सारं सारं पूर्ण करण्यासाठी
कितीही अोझं वाटलं, कितीही त्रास झाला
तरी तो मला जाणवू न देता
हे सारं सारं जगणं......
No comments:
Post a Comment